Saturday 8 August 2020

प्रिय ................

 

     प्रिय ................

नक्की नाव काय लिहू म्हणून ती जागा मोकळी सोडलीय . लग्नाच्या अगोदरच तुझ नाव निशा लिहू , कि लग्नानंतर मी ठेवलेलं रेवती लिहू, कि नुसत अग  म्हणू कि बाळाची आई म्हणू कि माझ्या सुधीर  नावाच पहिलं अक्षर सु आणि तुझ्या नावाच पहिलं अक्षर रे मिळून तयार झालेलं सुरे म्हणू , तुला सुरे जास्त आवडतना , तू बोलायचीस तेव्हा माझ्या आयुष्याला तुमच्यामुळे सूर मिळून माझ आयुष्य सुरेख झालय तर ठीक आहे प्रिय सुरे ...

   अक्षर जरा खराब येतंय , हात थरथरतात , वयामुळे नाही , आज साठ वर्ष झाली आपल्या लग्नाला तरी अजूनही तुझा विचार आला कि शहारा येतो आणि तोच शहारा उतरलाय अक्षरांमध्ये .

तस तुला लिहित असलेल हे माझ दुसर पत्र .

पहिलं पत्र आठवतंय मला –

      शिक्षण पूर्ण झाल्या नंतर मला नोकरी लागली होती . आई बाबाना किती आनंद झाला होता . खूप सारे पेढे वाटले होते मला नवीन कपडे घेतले होते आणि बोलले कि उद्या आपल्याला सगळ्याना फिरायला जायचंय, देवाचे दर्शन घेऊन येऊया  तुझे  मामा सुद्धा येणार आहेत .

दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे मामाच्या गाडी मधे बसून आळंदीला माउलींच्या दर्शनासाठी निघालो. गाडीमधेच मामानी बोलता बोलता प्रश्न केला शिक्षण झाल , नोकरी लागली आता लग्न करायचं का ? असा प्रश्न समोर पडल्यावर मी जरा गोंधळलो कारण लग्नाचा विचार मी तेव्हापर्यंत कधी केलाच नव्हता . मी स्पष्ट सांगितलं अजून दोन – तीन वर्ष तर नाही करायचंय नंतर मग पाहूया .

दर्शन वैगरे झाल सगळ . परतीच्या प्रवासात गाडीने वेगळा रस्ता पकडला आणि एका घरासमोर थांबली . आईने पदाराने माझा चेहरा पुसला , केस निट केले , आई मोठा झालोय मी आता , चूप... तू माझ बाळ आहेस अजून, आई हसून बोलली. चला उतरा पटकन आपल्याला समोरच्या घरात जायचंय बाबा बोलले . आम्ही सगळे गाडीतून उतरलो त्या घराकडे जायला निघालो तेव्हा कुठला सण वैगरे नव्हता पण अंगणात रांगोळी काढलेली होती . दारावर झेंडूच्या फुलांच्या माळा घातलेल्या होत्या सगळ स्वच्छ, सुंदर आणि निटनेटक दिसत होत .चटई अंथरण्यात आली . आम्ही सर्वजण त्यावर बसलो . आम्हा सगळ्यांची त्या घरातील प्रमुख माणसांशी ओळख करून दिली . ते मामांच्या जवळच्या मित्राच घर होत हे मला समजल.

   बाळा चहा आणि नाश्ता घेऊन ये असा आवाज किचन मध्ये देण्यात आला . पैंजणाच्या आवाजासोबत कुणीतरी जवळ येत असल्याच जाणवलं . पायाची शुभ्र बोट , अंगभर घातलेली मोरपंखी रंगाची साडी , लांबसडक काळेभोर केस,  केसांमध्ये मोगऱ्याचा गजरा , कानात जास्वंदीच्या फुलासारखं नक्षी असणार कानातलं , नाकात नथनी सोबत शेजारीच एक तीळ , नीरव समुद्रासारखे शांत डोळे त्यांना लावलेलं काजळ , कपळावरती एक लहानपणीची जखमेची खून जी अजून चेहऱ्याच सौंदर्य वाढवीत होती अशी एक सुंदर मूर्ती , कृती एक मुलगी खाली मान करत माझ्यासमोर येऊन उभी राहिली . क्षणभर मला काही समजलच नाही . मी कसाबसा चहा घेतला पण तो चेहरा माझ्यासमोरून काही केल्या जाईना , कुणाच्या तरी प्रेमात पडण्यासाठी एखादाच क्षण पुरेसा पडतो तो क्षण मी अनुभवत  होतो . सगळ्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या . आम्ही घरी जाण्यास  निघालो . पण मला काहीतरी झाल होत .मी कुठेतरी हरवलो होतो .

 गाडीत बसण्यास निघालो पण तरी सारख माघे वळून पहावस वाटत होत , एक दोनदा पाहिलही पण ती मुलगी दिसली नाही त्या घरातील सर्वजण आम्हाला बाहेर गाडीपर्यंत सोडवण्यास आले होते पण मला जिला पहायचं होत ती कुठेच दिसत नव्हती . गाडीत बसलो काच खाली केली घराकडे पाहिलं तेवढ्यात आजीच्या पदराआडून डोकावणाऱ्या मुलीची म्हणजेच तुझी आणि माझी पहिल्यांदा नजरानजर झाली . तो क्षण आजही आठवला तरी हृदयात धडधड वाढते ,अंगावर शहरा येतो .

  घरी आलो मामानी विचारले मुलगी आवडली का मी क्षणाचाही विलंब न करता हो बोललो . सगळे हसायला लागले . बऱ्याचदा अस होत ना आपण आपल्या मनातल जाणूनबुजून लपवून ठेवतो पण काही वेळेस ते अस उत्स्फूर्तपणे बाहेर पडत माझही  तसच  झाल होत . मघाशी दोन तीन वर्ष मी लग्न करणार नाही अशी माझीच वाक्य मला आठवली आणि मी हसू लागलो .

  बाबांनी मला पत्र लिहायला सांगितलं तुमची मुलगी पसंत आहे .पुढील बोलण्यासाठी आमच्या घरी भेटायला यावे वैगरे वैगरे . ते माझ पहिलं पत्र . ते लिह्तानी प्रत्येक अक्षर उमटवतानी मी तुझाच चेहरा रेखाटतोय अस मला भासत होत.

पुढे सहा महिन्यात आपल लग्न झाल . किती छान संसार केला तू . देवानेही आपल्या पदरात दोन सुंदर फुल टाकली आई बाबांची काळजी घेत त्यांच्या संस्कारानुसार आपणही मुलाचं संगोपन केलच कि. मुलाचं शिक्षण सगळ चांगल झाल . मुलांची लग्न हि झाली आपली मुलगी सासरी सुखात आहे आणि सून आणि मुलगा खूप चांगली काळजी घेतायत माझी .आपल्याला नातवंडहि आलेत . फक्त तूच नाहीयेस इथे . आता तू हवी होतीस . तुझ्या अगोदर मी जाणार होतोना तू का गेलीस अगोदर ? . तू माझा आधार होतीस तुझ अस अचानक जाण  माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी हानी आहे. तुझ नसन हे सगळ्यात मोठी कमी आहे.

  मला  सकाळी देवाची पूजा करतानी माझ्या हाताला लावलेला तुझा हात हवाय . रस्त्यावरून चालताना तुम्हाला एकतर ऐकायला कमी झालय कडेनी चालता येत नाही का असा ओरडा हवाय. गोड चमचमीत नाही खायचं आता जिभेला आराम द्या शुगर, बीपी त्रास आहेना गपचूप मी देयील ते खायचं अशी तुझी तंबी हवीय . तू दिलेला कारल्याचा ज्यूस मला  तोंड वाकड न करता प्यायचाय. चष्म्याच्या काचेवर धूळ साचलीय मला तुझ्याकडून नेहमीप्रमाणे ती पुसून हवीये . माझी किती काळजी घेतलीयस तू आता मला तुझी काळजी घ्यायचीय . खूप एकट एकट वाटतंय .मला तू माझ्या कायम सोबत हविय. माझ तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. जीव आहेस तू माझा . हे सगळ मला सांगायचंय . 

  हे माझ दुसर पत्र  पण ते तुला देऊ कस ?

मीच लवकरात लवकर तुझ्याकडे येतानी घेऊन येयीन ते ..

   कारण एवढ्या साठ वर्षामध्ये मला एक गोष्ट कळलीय, कि

 “मला तुझ्याशिवाय राहता येत नाही ”.

                                        तुझा आणि तुझाच,

                                            सुधीर   

 

 

    ..................! © समीर !.........................

Saturday 13 October 2018

तू गेल्यावर.............

वकिलाने दिलेल्या त्या घटस्फोटाच्या कागदावर आपल्या दोघांच्या शेवटच्या सह्या झाल्या
ज्यांच्यात कविता लिहायचो त्या फक्त रद्दीच्या वह्या झाल्या...

तु गेल्यावर अंगणातील तुळस केव्हाच सुकुन गेली ,
मोगरा कोमेजून गेला आणि सदाफुलीने फुलाय़ची आशाच सोडून दिली...

तू गेल्यावर अंगणातील चिमण्यासही दाणे वेचण्यास रस नाही ,
आकाशातील विहंगाला तू ठेवलेल्या वाटीतील पाणी पिण्याची आस नाही ...

तू गेल्यावर मोकळ घरं अगदी खायला उठलं ,
तुज्या पैंजणाची मधुर धून  नि बांगड्यांची खण खण
अजूनही ते गीत  माझ्या कानात साचलं ...

तू गेल्यावर दुःख आणि दुःखानीच भरून गेलो ,
आनंद सारे हरवून बसलो
विरहाचे नभ होऊन
अश्रुंमधून  कोसळत गेलो ..

तू गेल्यावर आयुष्याचे उरलेले दिवस मी  मोजत बसलो ..
तू असताना लाभलेल्या क्षणांचे सोनेरीपण मग मी जपत राहिलो ...


!!! समीर !!! 

Wednesday 11 July 2018

शाळेचा पहिला दिवस ....

         आज किती खुश मी शाळेचा पहिला दिवस
         नविन दप्तर, नविन कपडे , नविन वर्ग
         सार नविन अगदी मनासारखं मला भेटलेल...
              चाललोय मी आज शाळेत आनंदाने
                  सोबत मित्रही
                     रस्त्यामधे अचानक भेटतात मला ती तीन मुलं
                        हातात पिशव्या घेऊन भेटतील तिथल भंगार , डबडी गोळा करणारी
                      मग पहात राहतो मी त्यांना
                      त्यांची मळकी , फाटकी कपडे , अनवाणी पाय
                      ते पहात राहतात आमच्याकडे केविलवाण्या नजरेने
                      विचार येत राहतो एक सारखा का त्यांना उकीरड्याच जीणं
                      का नाही त्यांच्या चेहऱ्यावर आमच्या सारखा शाळेत जाण्याचा आनंद
                               शाळेत पोहचतो मी
                                घंटा वाजते ,शाळा भरते
                                   प्रार्थना सुरू होते "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे"
                                      इतक्या दिवस नुसतं म्हणलेल्या प्रार्थनेचा थोडासा अर्थ मला समजू लागतो
                         तास सुरू होतो
                         गुरुजी सुट्टी कशी गेली ,सुट्टीतली मजा सर्वांना विचारतात
                         खेळ , अभ्यासामधे वेळ निघुन जातो
                                  शेवटच्या तासात गुरुजी विचारतात तुम्ही मोठेपणी काय बनणार
                                  मुल सांगू लागतात डॉक्टर , इंजिनिअर, वकिल, शिक्षक आणि बरेच काही
                                  माझा नंबर येतो मी उठतो
                                  सकाळी दिसलेली ती तीन मुल मला आठवतात
                                  मी बोलतो
                                   मला अस बनायचय कि ज्या मुळे देशातील सगळ्या मुलांना शिक्षण घेता येईल
                                   कुणालाही भूकेसाठी भिक माघावी लागणारं नाही कि कुणाला भंगार गोळा कराव लागणार नाही .
                                   गुरुजी शाबासकी देतात .
                                                शाळा सुटते
                                                   मी घरी येतो
                                                      हात पाय धुतो
                                                         शुभं करोती म्हणतो
                                                             आणि लागतो अगदी मनापासून अभ्यासाला
                                                                   माझं नविन ध्येय गाठायला........
                                                                       .........! समीर ...........!

Sunday 8 July 2018

त्या तिथे दूर दूर.........


त्या तिथे दूर दूर पसरून निळाई साऱ्या सागरात.... 
वाटते सारे आकाश ओतलेले
 आणि एक चंद्र ह्रदयात .....

त्या तिथे दूर दूर हिरव्या डोंगरांच्या रांगात ....
वाहतो तो आपल्याच नादात शुभ्र झरा .......
ओळखीचे गाणे गात....

त्या तिथे दूर दूर जराश्या झुकलेल्या अंबरात.... 
दररोजच चित्र रेखाटतो रवी ....
अस्ताला जाताना संधीप्रकाशात....

त्या तिथे दूर दूर मोरपंखी स्वप्ने भासतात....
मी उगाच अनामिक चेहरा शोधतो ...
पाण्यात पडलेल्या माझ्याच प्रतिबिंबात ....

त्या तिथे दूर दूर आहे कुणीतरी वाट पहात ....
ह्रदयातील आर्त हाकेचे सुर क्षितीजावर नेहमी उमटतात ...
वाहतो हा बेधुंद वारा तुझ्याच अस्तित्वाची साक्ष देत ....

!!!© समीर !!!


Wednesday 30 August 2017

अजूनही असाच कधीतरी......

अजूनही असाच कधीतरी त्या उंच झाडाखाली जातो मी
कुठे सापडतीये का तुझी सावली 
ती अजूनही शोधतो मी

अजूनही असाच कधीतरी त्या गर्द रानात जातो मी
कुठे येतोय का तुझा आवाज
त्या पक्ष्यांच्या किलबिलाटामधे शोधतो मी

अजूनही असाच कधीतरी त्या दुरवरच्या रस्त्यावर पाउल टाकत राहतो मी
मिळेल तुझी सोबत ह्या आशेने 
अजुनही लांब पर्यंत एकटाच चालत राहतो मी….

अजूनही असाच कधीतरी त्या उंच कळसाच्या मंदिराकडे वळतो मी
कुठे सापडतात का तुझ्या  पाऊलखुणा
त्या पाऊल वाटेवर शोधतो मी.....................
 !! ©समीर !!






                                       

Thursday 17 August 2017

एक एकटा चंद्र ....

पहाटेचा चंद्र आज मला पुन्हा बोलवतो,
तुझ्या आठवणींच्या चांदण्यात मला पुन्हा भिजवतो,
एकटाच त्या शांत माळरानात माझा अश्रूंचा पुर पुन्हा तुझ्यासाठी वाहतो......
ते उंच निलगिरीच झाड मला पुन्हा बोलवतं,
तुझ्या प्रेमाची सावली पुन्हा माझ्यावर धरतं,
एकटाच उभा त्या शांत झाडाखाली असुनही जाळत्या उन्हात असल्या सारख वाटतं .....
ते निळ विस्तीर्ण चमचमत आकाश मला पुन्हा बोलवतं,
तुझ्या सारखं मायेच छत पुन्हा माझ्या वर धरतं,
विस्तिर्ण त्या निळ्या छताखाली असुनही पुन्हा तुझ्या शिवाय रिकाम रिकाम वाटतं .......
तो नुकताच उगवलेला सुर्य पुन्हा मला बोलवतो,
तु मला परत भेटेल अशी वेडी आशा दाखवतो ,
स्वैरभर वेड मन माझं किती आनंदी होतं ,
तु सोडून गेलीस मला आणि ह्या जगाला हे पुन्हा विसरतं.......
तुझ्या शेवटच्या सांगण्यानुसार हे सारेच मला दररोज बोलवतात,
तुझ्या इतकंच प्रेम देण्याच प्रयत्न ते करतात ,
पण तुझ्या शिवाय मला किती एकट एकट वाटतं ,
इथलं सारंच मला तुझ्या पुढं एकदम फिकं वाटतं ...
पुन्हा तुझ्या भेटीसाठी मी हात देवापुढे जोडतो
कोठेतरी तु भेटशीलच मला ,
ती वाट मी देवापुढे माघतो....

...................!©समीर !.........................

Sunday 13 August 2017

तुला न सांगितलेलं ......

कुणी इतकं कायमच प्रिय वाटेल आयुष्यभरासाठी असं वाटलं नव्हत कधी ,
पण तु भेटलीस त्या अश्याच एका वळणावर ,
त्या मळलेल्या वाटेवर तुझ्या पाऊलखुणा उमटल्या ,
आणि बहरली ती पाऊलवाट अगदी आजपर्यंत .

कसं ना समुद्र शेवटी नदीचीच वाट पहात असतो, मगच तो महासागर होतो ,
तुझ्या मुळेच तर सारं शक्य झालं मला मनासारखं करायला ,
तु प्रत्येक क्षणी माझ्या सोबतीला होतीस म्हणुनच तर मला पुढं जाता आल .

तेव्हा एकदा कसा निष्पर्ण जीर्ण वृक्षासारखा कोसळणारच होतो मी ,
पण तु कशी लतेसारखी बिलगली होतीस मला
आणि कसं घट्ट पकडून ठेवलं होत ,
मला नवीन पालवी फुटेपर्यंत .

माझ्या भकास आभाळात तुच तर चांदण्याची नक्षी भरली होतीस ,
माझ्या फुटक्याच शिंपल्यात तुझ्याच रूपात तर मला मोती भेटला होता,
आनंदाचे सारे रंग इंद्रधनु होऊन तुच तर मला दिले होते.

पण आता सरलेत ते दिवस ,
हातपाय थरथरतात ,
नजर अंधूक झालीय ,
तुझही तसंच झालय .
तरीही तु असतेस त्या भजनात ,
जपतेस माझ्यासाठी नित्य नेमाने माळ ,
असतेस नेहमी एखाद्या ग्रंथाच्या पानावर ,
मला बरं वाटावं म्हणून तुझ मन कायम त्या देव्हाऱ्यावर .

मीही माघत असतो तुझ्यासाठी देवाकडे बरेच काही ,
पण माझ्यासाठी तर तुच मीरा आणि तुच राधा ,
मग देवाकडे देवासाठीच काय माघाव ,

तो तर केव्हाच पावलाय मला तुझ्या रूपात .....

...............!!! ©समीर !!!..................

Saturday 12 August 2017

तु आणि तुच आहेस.......

ह्या अश्या मुग्धधुंद सांजवेळी तुझाच भास होत आहे ,
तु आसपासच कुठेतरी प्राजक्त गंधाळूनी सांगत आहे

निळ्या नभी तुझ्या आठवणींचा संथ थवा लहरतो आहे ,
कोकीळेच्या मधुर कंठात जणू तुझाच स्वर गातो आहे 

दुरवर कुठेतरी आल्हाद टाळ घंटानाद होत आहे ,
ऐकू येणाऱ्या भजनात तुझ्याच नामाचा जयघोष आहे

नुकतीच अलगद ढगाआडून चंद्रकोर उगवत आहे ,
उगवणाऱ्या चंद्रकोरीत मला तुझाच चेहरा दिसतो आहे

ह्या अश्या श्वेत चांदण्यात सावली माझी पडु पहात आहे ,
उमटणाऱ्या निळ्या सावलीत मला तुझाच आकार दिसतो आहे

शोधताना तुला कुठे कुठे तु सृष्टीच्या चराचरात व्यापुन आहेस ,
माझ्या आत्म्याच्या प्रतिबिंबातही तु आणि तुच साचून आहेस .



!!! …©समीर … !!!