प्रिय ................
नक्की नाव काय लिहू म्हणून ती जागा मोकळी सोडलीय .
लग्नाच्या अगोदरच तुझ नाव निशा लिहू , कि लग्नानंतर मी ठेवलेलं रेवती लिहू, कि
नुसत अग म्हणू कि बाळाची आई म्हणू कि
माझ्या सुधीर नावाच पहिलं अक्षर सु आणि
तुझ्या नावाच पहिलं अक्षर रे मिळून तयार झालेलं सुरे म्हणू , तुला सुरे जास्त
आवडतना , तू बोलायचीस तेव्हा माझ्या आयुष्याला तुमच्यामुळे सूर मिळून माझ आयुष्य
सुरेख झालय तर ठीक आहे प्रिय सुरे ...
अक्षर जरा खराब
येतंय , हात थरथरतात , वयामुळे नाही , आज साठ वर्ष झाली आपल्या लग्नाला तरी अजूनही
तुझा विचार आला कि शहारा येतो आणि तोच शहारा उतरलाय अक्षरांमध्ये .
तस तुला लिहित असलेल हे माझ दुसर पत्र .
पहिलं पत्र आठवतंय मला –
शिक्षण पूर्ण
झाल्या नंतर मला नोकरी लागली होती . आई बाबाना किती आनंद झाला होता . खूप सारे
पेढे वाटले होते मला नवीन कपडे घेतले होते आणि बोलले कि उद्या आपल्याला सगळ्याना
फिरायला जायचंय, देवाचे दर्शन घेऊन येऊया
तुझे मामा सुद्धा येणार आहेत .
दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे मामाच्या गाडी मधे बसून आळंदीला
माउलींच्या दर्शनासाठी निघालो. गाडीमधेच मामानी बोलता बोलता प्रश्न केला शिक्षण
झाल , नोकरी लागली आता लग्न करायचं का ? असा प्रश्न समोर पडल्यावर मी जरा गोंधळलो
कारण लग्नाचा विचार मी तेव्हापर्यंत कधी केलाच नव्हता . मी स्पष्ट सांगितलं अजून
दोन – तीन वर्ष तर नाही करायचंय नंतर मग पाहूया .
दर्शन वैगरे झाल सगळ . परतीच्या प्रवासात गाडीने वेगळा
रस्ता पकडला आणि एका घरासमोर थांबली . आईने पदाराने माझा चेहरा पुसला , केस निट
केले , आई मोठा झालोय मी आता , चूप... तू माझ बाळ आहेस अजून, आई हसून बोलली. चला
उतरा पटकन आपल्याला समोरच्या घरात जायचंय बाबा बोलले . आम्ही सगळे गाडीतून उतरलो
त्या घराकडे जायला निघालो तेव्हा कुठला सण वैगरे नव्हता पण अंगणात रांगोळी काढलेली
होती . दारावर झेंडूच्या फुलांच्या माळा घातलेल्या होत्या सगळ स्वच्छ, सुंदर आणि
निटनेटक दिसत होत .चटई अंथरण्यात आली . आम्ही सर्वजण त्यावर बसलो . आम्हा
सगळ्यांची त्या घरातील प्रमुख माणसांशी ओळख करून दिली . ते मामांच्या जवळच्या
मित्राच घर होत हे मला समजल.
बाळा चहा आणि नाश्ता घेऊन ये असा आवाज किचन मध्ये देण्यात आला . पैंजणाच्या आवाजासोबत कुणीतरी जवळ येत असल्याच जाणवलं . पायाची शुभ्र बोट , अंगभर घातलेली मोरपंखी रंगाची साडी , लांबसडक काळेभोर केस, केसांमध्ये मोगऱ्याचा गजरा , कानात जास्वंदीच्या फुलासारखं नक्षी असणार कानातलं , नाकात नथनी सोबत शेजारीच एक तीळ , नीरव समुद्रासारखे शांत डोळे त्यांना लावलेलं काजळ , कपळावरती एक लहानपणीची जखमेची खून जी अजून चेहऱ्याच सौंदर्य वाढवीत होती अशी एक सुंदर मूर्ती , कृती एक मुलगी खाली मान करत माझ्यासमोर येऊन उभी राहिली . क्षणभर मला काही समजलच नाही . मी कसाबसा चहा घेतला पण तो चेहरा माझ्यासमोरून काही केल्या जाईना , कुणाच्या तरी प्रेमात पडण्यासाठी एखादाच क्षण पुरेसा पडतो तो क्षण मी अनुभवत होतो . सगळ्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या . आम्ही घरी जाण्यास निघालो . पण मला काहीतरी झाल होत .मी कुठेतरी हरवलो होतो .
गाडीत बसण्यास
निघालो पण तरी सारख माघे वळून पहावस वाटत होत , एक दोनदा पाहिलही पण ती मुलगी
दिसली नाही त्या घरातील सर्वजण आम्हाला बाहेर गाडीपर्यंत सोडवण्यास आले होते पण
मला जिला पहायचं होत ती कुठेच दिसत नव्हती . गाडीत बसलो काच खाली केली घराकडे पाहिलं
तेवढ्यात आजीच्या पदराआडून डोकावणाऱ्या मुलीची म्हणजेच तुझी आणि माझी पहिल्यांदा
नजरानजर झाली . तो क्षण आजही आठवला तरी हृदयात धडधड वाढते ,अंगावर शहरा येतो .
घरी आलो मामानी
विचारले मुलगी आवडली का मी क्षणाचाही विलंब न करता हो बोललो . सगळे हसायला लागले .
बऱ्याचदा अस होत ना आपण आपल्या मनातल जाणूनबुजून लपवून ठेवतो पण काही वेळेस ते अस
उत्स्फूर्तपणे बाहेर पडत माझही तसच झाल होत . मघाशी दोन तीन वर्ष मी लग्न करणार
नाही अशी माझीच वाक्य मला आठवली आणि मी हसू लागलो .
बाबांनी मला पत्र
लिहायला सांगितलं तुमची मुलगी पसंत आहे .पुढील बोलण्यासाठी आमच्या घरी भेटायला
यावे वैगरे वैगरे . ते माझ पहिलं पत्र . ते लिह्तानी प्रत्येक अक्षर उमटवतानी मी
तुझाच चेहरा रेखाटतोय अस मला भासत होत.
पुढे सहा महिन्यात आपल लग्न झाल . किती छान संसार केला तू .
देवानेही आपल्या पदरात दोन सुंदर फुल टाकली आई बाबांची काळजी घेत त्यांच्या
संस्कारानुसार आपणही मुलाचं संगोपन केलच कि. मुलाचं शिक्षण सगळ चांगल झाल .
मुलांची लग्न हि झाली आपली मुलगी सासरी सुखात आहे आणि सून आणि मुलगा खूप चांगली
काळजी घेतायत माझी .आपल्याला नातवंडहि आलेत . फक्त तूच नाहीयेस इथे . आता तू हवी
होतीस . तुझ्या अगोदर मी जाणार होतोना तू का गेलीस अगोदर ? . तू माझा आधार होतीस
तुझ अस अचानक जाण माझ्या आयुष्यातील
सगळ्यात मोठी हानी आहे. तुझ नसन हे सगळ्यात मोठी कमी आहे.
मला सकाळी देवाची पूजा करतानी माझ्या हाताला लावलेला तुझा हात हवाय . रस्त्यावरून चालताना तुम्हाला एकतर ऐकायला कमी झालय कडेनी चालता येत नाही का असा ओरडा हवाय. गोड चमचमीत नाही खायचं आता जिभेला आराम द्या शुगर, बीपी त्रास आहेना गपचूप मी देयील ते खायचं अशी तुझी तंबी हवीय . तू दिलेला कारल्याचा ज्यूस मला तोंड वाकड न करता प्यायचाय. चष्म्याच्या काचेवर धूळ साचलीय मला तुझ्याकडून नेहमीप्रमाणे ती पुसून हवीये . माझी किती काळजी घेतलीयस तू आता मला तुझी काळजी घ्यायचीय . खूप एकट एकट वाटतंय .मला तू माझ्या कायम सोबत हविय. माझ तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. जीव आहेस तू माझा . हे सगळ मला सांगायचंय .
हे माझ दुसर पत्र पण ते तुला देऊ कस ?
मीच लवकरात लवकर तुझ्याकडे येतानी घेऊन येयीन ते ..
कारण एवढ्या साठ वर्षामध्ये मला एक गोष्ट कळलीय, कि
“मला तुझ्याशिवाय
राहता येत नाही ”.
तुझा
आणि तुझाच,
सुधीर